मंचर बनले दूध भेसळीचे केंद्रबिंदू; २ वर्षांपासून सुरू असलेल्या विषारी रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधारासह १३ आरोपींना बेड्या!


मंचर बनले दूध भेसळीचे केंद्रबिंदू; २ वर्षांपासून सुरू असलेल्या विषारी रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधारासह १३ आरोपींना बेड्या!
मंचर:
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी क्रूर खेळ करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या या विषारी खेळात सामील असलेल्या मुख्य सूत्रधार सुशांत बबनराव हिंगे याच्यासह तब्बल १३ मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी अंदाजे २.५ ते ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मंचर परिसर दूध भेसळीचे मुख्य केंद्रबिंदू बनल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी माहिती समोर आली आहे. हे आरोपी केवळ पाणी न मिसळता, थेट रासायनिक पाण्याचा वापर करून दुधाची मात्रा वाढवत होते.
१,००० लिटर शुद्ध दुधात तब्बल ५०० लिटर रासायनिक पाणी मिसळले जात होते.
५०० लिटर दुधाच्या साठ्यात तब्बल ३०० लिटरपर्यंत भेसळ केली जात होती.
गेल्या दोन वर्षांपासून हे विषारी दूध लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हजारो ग्राहकांच्या पोटात जात होते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता.
⚖️ कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त; गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल
मंचर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात तब्बल २.५ ते ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे केमिकल्स, यंत्रसामग्री, वाहने आणि दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या १३ ही आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
💬 “कोणाचीही गय केली जाणार नाही!” – प्रशासनाचा कडक इशारा
या मोठ्या कारवाईनंतर प्रशासनाने आणि पोलीस विभागाने दूध माफियांचे धाबे दणाणणारे कडक आदेश जारी केले आहेत.
“सर्वसामान्यांचे आरोग्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दुधासारख्या जीवनावश्यक पदार्थात विष कालवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा पूर्णपणे बिमोड केला जाईल. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन तपास केला जाईल आणि यात सामील असलेल्या कोणत्याही मोठ्या किंवा राजकीय व्यक्तीची गय केली जाणार नाही.”
मंचर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असले, तरी या दुधाचा पुरवठा नक्की कुठे आणि कोणत्या मोठ्या ब्रँड्सना केला जात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पत्रकार स्वप्नील लुनावत


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!