चिंचवडचे ऐतिहासिक मोरया गोसावी मंदिर परिसर पाण्याखाली; संततधार पावसामुळे पवना नदीच्या जलस्तरात वाढ
चिंचवड:गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंचवड येथील ऐतिहासिक व जगप्रसिद्ध मोरया गोसावी मंदिर परिसर पाण्याखाली गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवना धरणातून अद्याप पाण्याचा अधिकृत विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही; मात्र परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे.मंदिराच्या मुख्य तटबंदीला पुराच्या पाण्याने वेढले असून, सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्सही पाण्यात बुडाले आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे सध्या मुख्य गाभाऱ्याकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रशासनाचे आवाहन:
पूर पाहण्यासाठी किंवा फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी नागरिकांनी मंदिर परिसर, घाट किंवा पुलावर गर्दी करू नये.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








