उमदी येथे ‘१०८’ रुग्णवाहिकेसाठीचे बेमुदत उपोषण अखेर मागे; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित!
वळसंग : जत तालुक्यातील उमदी आणि परिसरातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध व्हावी,यासाठी पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण अखेर सोमवारी समोपचाराने मागे घेण्यात आले आहे.
उमदी येथे कायमस्वरूपी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात यावी,या प्रमुख मागणीसाठी ‘तालुका पाणी संघर्ष समितीच्या’ वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.उमदी व परिसरातील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी हक्काची रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गंभीर बाब ओळखून समितीने प्रशासनाविरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसले होते.आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनस्तरावर तातडीने पाठवून, त्यावर आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दिले.प्रशासनाच्या या ठोस आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान,प्रशासनाने केवळ आश्वासन न देता या निर्णयाची लवकरात लवकर आणि तातडीने अंमलबजावणी करावी,अशी आग्रही अपेक्षा आंदोलकांनी व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.जर दिलेल्या वेळेत मागणी पूर्ण झाली नाही,तर आगामी काळात तीव्र पावले उचलली जातील असा सूरही उमटत आहे.
पत्रकार : संजय कोळी.
७८७५९०३७७७.






