रावेतमध्ये महावितरण कार्यालयाबाहेर नागरिकांचे तीव्र आंदोलन; ४८ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा ठप्प
पिंपरी-चिंचवड: रावेत परिसरात गेल्या ४८ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. कोट्यवधी रुपये मोजून घरे खरेदी करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रहिवाशांनी महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
रावेतमधील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये दोन दिवसांपासून वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजपुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठा अडथळ्यात आला असून लिफ्टही बंद पडल्या आहेत. उकाड्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महावितरणच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात शेकडो नागरिकांनी थेट कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली आणि ठिय्या आंदोलन केले. “वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा” अशी मागणी करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






