आई, मी नदीत उडी मारतोय…” म्हणत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; रावेत पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण


“आई, मी नदीत उडी मारतोय…” म्हणत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; रावेत पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण

पिंपरी-चिंचवड :ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्याने आलेल्या नैराश्यातून २० वर्षीय तरुणाने रावेत येथील पवना नदीवरील संत तुकाराम महाराज पुलावरून (लंडन ब्रिज) उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रावेत पोलिसांच्या सतर्कता, धाडस आणि समयसूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास आहे. ऑनलाइन जुगारात सुमारे १५ हजार रुपये गमावल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. या नैराश्यातून त्याने रावेत येथील लंडन ब्रिजवर जाऊन आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला. “आई, मी नदीत उडी मारतोय…” असे सांगत तो पुलाच्या कठड्यावर उभा होता.
याचवेळी रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि दशरथ सदगीर हे परिसरात नियमित गस्त घालत होते. पुलाच्या कठड्यावर संशयास्पदरीत्या उभा असलेला तरुण त्यांच्या निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्याच्याशी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तरुण व्हिडिओ कॉलमध्ये गुंतलेला असतानाच दोन्ही पोलिसांनी अत्यंत चातुर्याने मागून झडप घालत त्याला सुरक्षित पकडले आणि आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला.
त्यानंतर पोलिसांनी तरुणाचे समुपदेशन केले तसेच त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या स्वाधीन केले. या धाडसी आणि समयसूचक कामगिरीबद्दल पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि दशरथ सदगीर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
टीप : मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास, विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. वेळेवर मिळालेली मदत जीव वाचवू शकते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!