कमालपूर-भोकर रस्त्याच्या कामासाठी निधी देऊ ना. शंभुराजे देसाई

टाकळीभान प्रतिनिधी-तालुक्यातील कमालपूर येथील प्रसिद्ध असलेल्या महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी मंदिर व शिख समाजाच्या पवित्र गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या भाविकांचे रस्त्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यासाठी कमालपूर ते भोकर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामासाठी निधी देण्यासाठी निश्चित सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री ना.श्री. शंभूराजे देसाई यांनी दिले.
मुंबई येथील ना देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी कमलपूरचे माजी सरपंच सचिन मुरकुटे, रोहन डावखर, पत्रकार सुरेश कांगुणे, प्रणव कारंजकर यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्याप्रसंगी ना. देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ना.देसाई यांनी पर्यटन विकास अंतर्गत राज्यातील महानुभाव पंथाच्या मंदिर व आश्रम विकासाकरिता ६६ कोटी ५० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यात सुमारे ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने त्यांचा कमालपूर ग्रामपंचायतच्यावतीने अभिनंदनचा ठराव देऊन सचिन मुरकुटे यांनी सत्कार केला.
यावेळी कमालपुर ग्रामपंचायतचे मार्गदर्शक भास्करराव मुरकुटे, सरपंच सौ. स्वाती सचिन मुरकुटे, उपसरपंच ललिता गोरे, राहुल बारस्कर, किरण गोरे, नंदू शिरसाठ, सुवर्णा गोरे, उषा करपे, जिजाबाई जाधव आर्दीचे सह्या असलेले मागणीचे निवेदन ना. देसाई यांना देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे व की, अहिल्यानगर संभाजीनगर जिल्ह्याला कमालपुर जोडणारा भोकर रस्ता आहे. त्याचबरोबर कमालपूर येथे महानुभाव पंथीयांचे श्री चक्रधर स्वामी मंदिर व शीख समाजाचे गुरुद्वारा असून येथे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात. परंतु कमालपुर ते भोकर हा साडेआठ किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब असल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याकरिता या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईतील रॉयल स्टोन निवासस्थानी भेट घेण्यात आली. महानुभाव पंथांच्या मंदिर विकासाकरिता महायुती सरकारने दिलेल्या निधीबद्दल ना. विखे पाटील यांचा सत्कार करून आभार मानले. त्याचबरोबर त्यांनाही भोकर ते कमलपूर रस्ता काँक्रिटीकरण संदर्भात निवेदन देऊन तसेच इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर






