महावितरणचा ढिसाळ कारभार; चिंचवडवासीय त्रस्त ​वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांचा इशारा


महावितरणचा ढिसाळ कारभार; चिंचवडवासीय त्रस्त
​वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांचा इशारा

​चिंचवड:गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चिंचवडगाव आणि परिसरात महावितरणच्या कारभारामुळे विद्युत पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणावर खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर व परिसरातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरणचे अभियंता मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.
​विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणे अत्यंत छोटी असतात; परंतु योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे कधी चार-पाच तास, तर कधी तब्बल आठ तास वीज गायब असते. खाजगी एजन्सी वेळेवर न मिळणे किंवा केबल टेस्टिंग गाडी वेळेत उपलब्ध न होणे अशी कारणे प्रशासनाकडून पुढे केली जातात. या बाबींचे पूर्व  नियोजन करणे अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना, नियोजनाच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
​सध्या अनेक ठिकाणी खाजगी एजन्सीमार्फत महावितरणची कामे केली जात आहेत. जर या खाजगी एजन्सी मनमानी कारभार करत असतील, तर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गप्प का आहेत, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.
​वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि वारंवार होणारे खंडन थांबवावे. अन्यथा पुढील काळात नागरिकांच्या तीव्र रोषाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागेल, असा इशारा मधुकर बच्चे यांनी दिला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!