मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; १९० किलो वजन उचलत भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले सुवर्ण
ग्लासगो : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने एकूण १९० किलो वजन उचलत ही ऐतिहासिक कामगिरी केली.
३१ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८५ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात १०५ किलो वजन उचलून एकूण १९० किलोची नोंद केली. तिच्या या कामगिरीने राष्ट्रकुल स्पर्धेचा तसेच राष्ट्रकुल विक्रमही मोडला.
या विजयासह मीराबाई चानू राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदके जिंकणारी पहिली महिला वेटलिफ्टर ठरली. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील हे तिचे एकूण चौथे पदक आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे भारताच्या पदक खात्याची सुवर्ण सुरुवात झाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





