वालसावंगीतील दीड कोटींच्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश; पहिल्याच पावसात छताला गळती


वालसावंगीतील दीड कोटींच्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश; पहिल्याच पावसात छताला गळती

वालसावंगी (प्रतिनिधी – महेंद्र बेराड):
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत अंदाजे दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतील निकृष्ट दर्जाच्या कामाचा पहिल्याच पावसात पर्दाफाश झाला आहे. रिमझिम पावसातच इमारतीच्या छताला गळती लागून विविध खोल्यांमध्ये पाणी साचल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही इमारत उभारण्यात आली. मात्र, बांधकाम सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला जात आहे. तरीही संबंधित यंत्रणेकडून या तक्रारींची प्रभावी दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या पावसानंतर इमारतीच्या छतामधून पाणी गळून अनेक खोल्यांमध्ये पाणी साचले. छतावरील वॉटरप्रूफिंग तसेच स्लॅबच्या कामाच्या गुणवत्तेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नव्याने उभारलेल्या इमारतीची अशी अवस्था पाहून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

– संपूर्ण बांधकामाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
– कामाचे मोजमाप, गुणवत्ता आणि अंदाजपत्रकाची पडताळणी करण्यात यावी.
– दर्जेदार कामाची खात्री होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे कोणतेही देयक अदा करू नये.
– निकृष्ट कामासाठी जबाबदार आढळणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

या प्रकरणामुळे जनतेच्या करातून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वालसावंगी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!