पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी
पुणे:
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो (मार्ग ३) ची पहिली ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या यशस्वी चाचणीमुळे लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या सुमारे १३ किलोमीटरच्या मार्गाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून आवश्यक मंजुरी मिळाली आहे. सुमारे ₹८,३१३ कोटी खर्चाच्या या मेट्रो प्रकल्पात एकूण २३ स्थानके असून, प्रारंभी १२ स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.
हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील लाखो प्रवाशांना या मेट्रोचा मोठा लाभ होणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, दररोजच्या वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क ते जिल्हा न्यायालय परिसरादरम्यान थेट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







