पिण्याचे पाणी, खुर्च्या, डीपीसह मूलभूत सुविधांची मागणी; पारध उपकेंद्राचा प्रश्न ऐरणीवर


पिण्याचे पाणी, खुर्च्या, डीपीसह मूलभूत सुविधांची मागणी; पारध उपकेंद्राचा प्रश्न ऐरणीवर

उपकेंद्रातील मूलभूत सुविधांचा अभाव; ग्रामपंचायतीकडे निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी

पारध (प्रतिनिधी : महेंद्र बेराड) – भोकरदन तालुक्यातील मोठे गाव असलेल्या पारध शाहूराजे येथील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याने समुदाय आरोग्य अधिकारी रेश्मा चौधरी यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करून तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. हे निवेदन ग्रामसेवक गजानन उंबरकर यांच्याकडे देण्यात आले.

पारध हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्यामुळे उपकेंद्रात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर, रुग्णांसाठी पुरेशा खुर्च्या, टेबल, आवश्यक साहित्य तसेच अखंड वीजपुरवठ्यासाठी सिंगल फेज डीपी नसल्याने रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय उपकेंद्रासमोरील परिसरात पेव्हर ब्लॉक अथवा सिमेंट काँक्रीटचे काम नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल साचतो. त्यामुळे गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व इतर रुग्णांना आरोग्य केंद्रात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक ठिकाणी अशा मूलभूत सुविधांचा अभाव चिंताजनक असल्याची भावना ग्रामस्थ व रुग्णांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीने निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

रेश्मा चौधरी (समुदाय आरोग्य अधिकारी) म्हणाल्या, “पारध उपकेंद्रात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र पिण्याचे पाणी, खुर्च्या, टेबल, सिंगल फेज डीपी व इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच उपकेंद्रासमोर चिखल होत असल्याने विशेषतः गरोदर महिलांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी.”


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!