महाराष्ट्रात कॅब-रिक्षा चालकांसाठी मराठीचे कार्यज्ञान बंधनकारक; नियमभंग केल्यास परवाना निलंबित होणार
मुंबई : महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहतूक क्षेत्रात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. कॅब, टॅक्सी, रिक्षा तसेच अॅप-आधारित कॅब चालकांना मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमांमध्ये ओला, उबर, रॅपिडोसारख्या अॅप-कॅब सेवांशी संबंधित चालकांचाही समावेश आहे.
नियमांनुसार चालकाला प्रवाशांशी मूलभूत संवाद साधता येईल, इतके मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे अपेक्षित आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना ते आत्मसात करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
मुदत संपल्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास चालकाच्या ड्रायव्हिंग ऑथरायझेशनवर तीन महिन्यांपर्यंत निलंबनाची कारवाई होऊ शकते. वारंवार नियमभंग झाल्यास परवाना किंवा बॅज रद्द करण्याचीही तरतूद असल्याचे वृत्त आहे.
या निर्णयामुळे राज्यातील व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान आत्मसात करणे आवश्यक ठरणार आहे. सरकारचा उद्देश चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ करणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






