वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट; डॉ. निलेश मळेकर यांच्या कार्यतत्परतेमुळे रुग्णांना मोठा आधार
वालसावंगी | प्रतिनिधी महेंद्र बेराड:-
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गेल्या काही काळात लक्षणीय कायापालट झाला असून, परिसरातील ग्रामीण नागरिकांसाठी हे केंद्र आरोग्यसेवेचा विश्वासार्ह आधार बनत आहे. पूर्वी वैद्यकीय अधिकारी उपलब्धतेबाबत अडचणी जाणवत असलेल्या या केंद्रात आता नियमित वैद्यकीय सेवा मिळत असल्याने रुग्णांचा ओघ वाढला आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश मळेकर तसेच डॉ. अनुष्का भुते यांच्या कार्यतत्परतेमुळे रुग्णांना वेळेवर तपासणी, उपचार आणि औषधोपचार मिळत आहेत. तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद अलकसेरी यांच्या कार्यकाळातही केंद्राच्या सेवा सुधारण्यास हातभार लागल्याचे सांगण्यात येते.
सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज जवळपास १०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात (OPD) तपासणी होत असल्याची माहिती आहे. दवाखान्याच्या नियमित वेळेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत करण्यासाठी डॉक्टरांकडून तत्पर प्रतिसाद दिला जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात परिसरातील सुमारे आठ गावांचा समावेश असून, या गावांमध्येही आरोग्यविषयक सेवा आणि उपक्रम राबविले जात आहेत. मानव विकास मिशनअंतर्गत आरोग्य शिबिरे वेळेवर आयोजित केली जात असून, प्रसूती सेवांमध्येही या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
विशेष म्हणजे, एकाच दिवशी सहा सुखरूप प्रसूती हाताळल्याचा अनुभव या केंद्राशी संबंधित आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात असल्याने गंभीर परिस्थितीत रुग्णांना मोठा आधार मिळत आहे.
त्यामुळे वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख आता परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने ‘हक्काचा दवाखाना’ म्हणून निर्माण होत असून, ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षमपणे कार्य करू शकते, याचे हे एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश मळेकर म्हणाले—
“आम्ही केवळ आमचे कर्तव्य बजावत आहोत. रुग्णांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना योग्य वेळी उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे. गावातील लोकांचा विश्वास आणि प्रेम हेच आम्हाला काम करण्याची ऊर्जा देते. संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले असून, यापुढेही ही आरोग्य सेवा अविरतपणे सुरू ठेवणार आहोत.”
ग्रामस्थ गणेश गाडेकर यांची प्रतिक्रिया
“डॉ. निलेश मळेकर आणि त्यांच्या टीमच्या कार्यामुळे आमच्या गावातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलला आहे. पूर्वी उपचारासाठी दूर जावे लागत होते; मात्र आता वेळेवर सेवा मिळत आहे. डॉ. मळेकर स्वतः फोनवर उपलब्ध असतात आणि अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात. गरजू रुग्णांना रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली जाते. अशा कर्तव्यदक्ष डॉक्टरांमुळे ग्रामस्थांना मोठा आधार मिळत आहे.”





