महाराष्ट्राला आर्थिक धक्का! पाच वर्षांत ३६,२११ खासगी कंपन्या बंद; लोकसभेत केंद्राची माहिती
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रासंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली.
मुंबई, पुणे, ठाण्याला सर्वाधिक फटका
कंपन्या बंद होण्याच्या संख्येत मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत १२,००९, पुण्यात ६,४३३, तर ठाण्यात ४,७०४ कंपन्या बंद झाल्या आहेत. याशिवाय नागपूरमध्ये १,४७८, नाशिकमध्ये ८४०, रायगडमध्ये ८२२ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ६५४ कंपन्या बंद झाल्याची नोंद आहे.
व्यापार क्षेत्र सर्वाधिक प्रभावित
क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार व्यापार क्षेत्रातील ४,१९६ कंपन्या बंद झाल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील २,३५६, तर शेती क्षेत्रातील १,१७८ कंपन्यांना टाळे लागले आहे.
मोठ्या संख्येने कंपन्या बंद झाल्याने त्याचा रोजगार, गुंतवणूक आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम झाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच या कंपन्या बंद होण्यामागची प्रमुख कारणे कोणती, याबाबतही अधिक माहिती समोर येणे अपेक्षित आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






