पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोधचिन्हाला नवा दमदार लूक!

पिंपरी-चिंचवड, दि. १४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत बोधचिन्हाला आता नवे आणि अधिक भव्य स्वरूप मिळणार आहे. नव्या रचनेत छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा अधिक ठळक करण्यात आली असून, ‘कटिबद्धा जनहिताय’ हे महापालिकेचे ब्रीदवाक्यही अधिक स्पष्टपणे झळकणार आहे.
सध्याचे बोधचिन्ह स्केचसदृश स्वरूपात आहे. त्यात बदल करून कांस्यधातूचा आभास निर्माण करणारे आकर्षक आणि दमदार स्वरूप देण्यात आले आहे. जनहिताची कामे, प्रशासकीय बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक म्हणून नव्या बोधचिन्हाची रचना करण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने उपसूचनेद्वारे या नव्या बोधचिन्हाच्या रचनेला मंजुरी दिली आहे. आता आयुक्तांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
महापालिका भवनासह शहरातील सर्व १० क्षेत्रीय कार्यालये तसेच विविध विभागांच्या इमारतींवर हे नवे बोधचिन्ह लावण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतींना एकसंध आणि अधिक प्रभावी दृश्य ओळख मिळणार असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवातही नव्या बोधचिन्हामुळे भर पडणार आहे.




