पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्रात उच्चस्तरीय समिती
मुंबई : राज्यातील परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा पद्धती अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे.
या समितीकडून राज्यातील विविध परीक्षांच्या सध्याच्या पद्धतीचा सर्वंकष अभ्यास केला जाणार असून, परीक्षा प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सुधारणा आणि उपाययोजनांबाबत सरकारला अहवाल सादविला जाणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारचा पेपरफुटीविरोधातील कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत देण्यात आले. पेपरफुटी, कॉपी आणि परीक्षेतील इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच परीक्षा यंत्रणेत तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावरही भर दिला जाण्याची शक्यता आहे.
पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी सरकारकडून हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





