₹१०.७४ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीत रील क्रिएटरला अटक


₹१०.७४ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीत रील क्रिएटरला अटक

पुणे : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ₹१०.७४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी २६ वर्षीय सोशल मीडिया रील क्रिएटर रोहन रामेश्वर जाधव (पिंपळे गुरव) याला अटक केली आहे.
फसवणूक करणाऱ्या आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. त्यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रकरणात कारवाई सुरू असल्याचे सांगत ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करण्यात आला. त्यानंतर भीती दाखवून त्यांच्या बचतीतील कोट्यवधी रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळवून घेण्यात आले. या प्रकरणातील एकूण फसवणुकीची रक्कम ₹१०.७४ कोटी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान या रकमेचा प्रवास अनेक बँक खात्यांमधून झाल्याचे आढळून आले. रील क्रिएटर रोहन जाधवने कथितरित्या सायबर गुन्हेगारांना म्युल बँक खाती उपलब्ध करून देण्याची भूमिका बजावली, असा पोलिसांचा संशय असल्याचे वृत्त आहे. या माध्यमातून फसवणुकीची रक्कम पुढे वळवण्यात आल्याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात यापूर्वीही काही आरोपींना अटक करण्यात आली असून, फसवणुकीच्या मोठ्या नेटवर्कचा शोध पुणे सायबर पोलिस घेत आहेत. या टोळीचे इतर सदस्य आणि पैशांचा अंतिम प्रवाह याबाबत पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांनी सावध राहावे : कोणताही CBI, पोलीस किंवा सरकारी अधिकारी फोन अथवा व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैसे मागत नाही. अशा प्रकारचा कॉल आल्यास तातडीने संबंधित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!