परदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् ६ जिवंत काडतुसांसह दोघे लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात; खडकी रेल्वे स्थानकातील कारवाई
पुणे:स्वातंत्र्यदिन व अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पुणे लोहमार्ग पोलिसांनी राबवलेल्या विशेष तपास मोहिमेदरम्यान खडकी रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करत परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक केली आहे.
वीर श्याम दलगज (वय २२, रा. पारसी चाळ, देहूरोड, किवळे) आणि त्याचा साथीदार सार्थक शिवनागी वाघलगवे (वय २२, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांचे पथक खडकी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गस्त घालत होते. त्यादरम्यान अंधारात एक संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे मिळून आली.
पोलिसांनी आरोपी वीर दलगज याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात यापूर्वीच दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून त्याचा साथीदार सार्थक वाघलगे यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
ही धडक कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस निरीक्षक सीताराम फंड, पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे, यशवंत साळुंखे, सहायक पोलीस फौजदार अमरदीप साळुंखे, पोलीस हवालदार इम्तियाज आवटी, पोलीस हवालदार धीरज कपिले हवालदार प्रशांत डोईफोडे , पोलीस अंमलदार अमोल शेळके, पोलिस अंमलदार अमोल कोकणे पोलीस अंमलदार सागर शेंडकर गणेश बच्छाव गणेश माळी,रणदिवे आणि रेल्वे सुरक्षा बल प्रधान आरक्षक श्री चंद्रशेखर पाटील व त्यांच्या पथकाने केली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






