पुण्यात FDAचा दणका; कॅम्पमधील प्रसिद्ध बर्गर किंग आउटलेट सील
पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंग आउटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित आउटलेटचा अन्न परवाना निलंबित करून ते सील करण्यात आले.
महाराष्ट्र FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्नसुरक्षेबाबत विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत पुण्यातील कॅम्प येथील बर्गर किंग आउटलेटची तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याचे FDAकडून सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करत आस्थापनेचा परवाना निलंबित केला आणि आउटलेट बंद करून सील केले.
दरम्यान, ११ ते १४ ऑगस्टदरम्यान पुणे विभागात करण्यात आलेल्या तपासणीत १६ खाद्य आस्थापनांवर परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मोठ्या खाद्य ब्रँड्सकडूनही अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





