अश्लील ‘डीजे लावणी’ला आळा; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयुक्तता प्रमाणपत्र बंधनकारक


अश्लील ‘डीजे लावणी’ला आळा; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयुक्तता प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रातील लावणी आणि लोककलेच्या नावाखाली सादर होणाऱ्या अश्लील कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे ‘योग्यता प्रमाणपत्र’ (Suitability Certificate) घेणे आवश्यक करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेताना संबंधित योग्यता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे लावणी, लोकनाट्य, तमाशा तसेच अन्य सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या संहिता, निवेदन किंवा सारांश असलेल्या मनोरंजन कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्राची तरतूद आधीपासूनच आहे.
दरम्यान, डीजेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या अश्लील लावणीला आळा घालून पारंपरिक लोककलेचे स्वरूप आणि पावित्र्य जपण्यावर भर देण्यात येत आहे. पारंपरिक वाद्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या सूचना सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राची लावणी आणि लोककला ही राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या कलाप्रकाराचे मनोरंजनाच्या नावाखाली होणारे विकृतीकरण रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!