गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

टाकळीभान प्रतिनिधी : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच १५ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेच्या वतीने लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूरच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूरचे अध्यक्ष सरमितसिंग चुग होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूरच्या वतीने कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलांना विशेष मदत म्हणून दप्तर, कंपास पेटी, वह्या यासह विद्यार्थ्यांना सुमारे सहा महिने पुरेल एवढे शालेय साहित्य देण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विशाल खैरे म्हणाले, “विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. समाजातील उपेक्षित, वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून करण्यात येणारे हे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी या मदतीचा योग्य उपयोग करून मन लावून अभ्यास करावा आणि भविष्यात मोठे अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी.”
लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूरचे अध्यक्ष सरमितसिंग चुग यांनी सांगितले की, “विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेल्या सात वर्षांपासून सातत्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत आहे. हा समाजहिताचा अत्यंत चांगला उपक्रम असून, या कार्यक्रमात सहभागी होताना आम्हाला समाधान वाटत आहे.”
मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण गुलाटी यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने यापुढेही अशाच प्रकारे समाजहिताचे कार्य सुरू ठेवावे. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना आमचे कायम सहकार्य राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमास मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्ये, संचालक बाळासाहेब खाबिया लायन्स क्लबचे सचिव सोमेश देशमुख खजिनदार राहुल होले पत्रकार दिलीप लोखंडे शालिनी ससाने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, लायन्स क्लबचे सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सुभाष त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सचिव लक्ष्मण पडवळ यांनी मानले
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







