लव जिहाद, धर्मांतरण आणि घुसखोरीविरोधात कठोर कायदा करा; महंत अनिकेतशास्त्री महाराजांची मागणी
विशेष प्रतिनिधी : देशाची एकता, अखंडता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर विषयांवर केवळ चर्चा न करता संविधानाच्या चौकटीत प्रभावी आणि स्पष्ट कायदे करण्याची गरज आहे, अशी भूमिका अखिल भारत हिंदू महासभेच्या धर्माचार्य प्रकोष्ठाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी मांडली.
जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतरण, अवैध घुसखोरी, भ्रष्टाचार तसेच लोकसंख्येशी संबंधित विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने कायदेशीर चौकटीत ठोस आणि दीर्घकालीन धोरण आखावे, अशी मागणी त्यांनी केली.
महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केंद्र सरकारसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिषाद्वारे होणाऱ्या धर्मांतरणाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र स्तरावर स्पष्ट कायदा करण्यात यावा. तसेच अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा आणि कायदेशीर यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी त्यांनी केली.
भ्रष्टाचाराविरोधातील विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींवर वेळेत कठोर कारवाई व्हावी. तसेच लोकसंख्येतील बदल आणि असंतुलनाच्या प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर तथ्याधारित व निष्पक्ष चर्चा करून दीर्घकालीन धोरण तयार करावे, असेही त्यांनी म्हटले.
महिला, तरुण आणि इतर दुर्बल घटकांना फसवणूक, शोषण किंवा जबरदस्तीपासून संरक्षण मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“भारत हे लोकशाही आणि घटनात्मक राष्ट्र आहे. त्यामुळे आमच्या मागण्या कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा समाजाच्या विरोधात नसून कायद्याचे राज्य, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी आहेत. या विषयांवर संसदेत प्रभावी कायदेशीर पाऊल कधी उचलले जाणार?” असा सवाल महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केंद्र सरकारला केला.
देशातील संवेदनशील विषयांवर सामाजिक सलोखा कायम ठेवत संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







