लिंबाचे झाड पडून दुभती गाय ठार; शेतकरी कुटुंबावर संकट


लिंबाचे झाड पडून दुभती गाय ठार; शेतकरी कुटुंबावर संकट

मिरचीचे पीकही गेले; शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी – बोरशे गुरुजी
भोकरदन, दि. १९ ऑगस्ट २०२६ : तालुक्यातील करजगाव येथे लिंबाचे मोठे झाड अचानक कोसळून दुभती गाय ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेत गरीब शेतकरी गंजीधर नानाभाऊ लोखंडे यांचे अंदाजे १ ते १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
गंजीधर लोखंडे यांच्या शेतातील लिंबाचे झाड अचानक दुभत्या गायीवर कोसळले. झाडाखाली दबून गायीचा जागीच मृत्यू झाला. घरच्या उदरनिर्वाहासाठी दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागवला जात होता. मात्र, अचानक गाय दगावल्याने लोखंडे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
आधीच मिरचीचे पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यातच उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या सावकारी कर्जाचा बोजा असताना घराचा चरितार्थ चालवणारी दुभती गायही गेल्याने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे “दुष्काळात तेरावा महिना” अशी अवस्था या शेतकरी कुटुंबाची झाली आहे.
घटनेची जिओ-टॅग छायाचित्रे घेण्यात आली असून घटनास्थळी बोरशे गुरुजी, नाना लोखंडे, देविदास लोखंडे, सुरेश लोखंडे, अमोल लोखंडे, गणेश वानखडे, संतोषराव बोरशे, गजु महाराज यांच्यासह पंचांनी पाहणी केली. या घटनेमुळे लोखंडे कुटुंबातील महिला व इतर सदस्य शोकाकुल झाले असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तातडीने पंचनामा करून मदतीची मागणी
शेतकऱ्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी व पंचनामा करावा. तसेच गरीब शेतकरी गंजीधर लोखंडे यांना शासनाकडून तातडीने आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी बोरशे गुरुजी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
“आधीच पिकाचे नुकसान झाले आहे. आता दुभती गाय गेल्याने या कुटुंबाच्या उत्पन्नाचा आधारच हिरावला गेला आहे. शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने मदत करावी,” अशी मागणी बोरशे गुरुजी यांनी केली.

प्रतिनिधी महेंद्र बेराड


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!