‘स्कूल ठीक करो’ अभियान आता जनआंदोलन बनले पाहिजे : बोरशे गुरुजी
शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी नागरिक, पालक, शिक्षक आणि प्रशासनाने एकत्र येण्याचे आवाहन
दि. 17 ऑगस्ट 2026 : “शिक्षणाशिवाय राष्ट्र घडत नाही, समाजाची प्रगती होत नाही आणि तरुणांचे भविष्यही सुरक्षित होत नाही. त्यामुळे सरकारी व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेले ‘स्कूल ठीक करो अभियान’ आता केवळ अभियान न राहता जनआंदोलन बनले पाहिजे,” असे आवाहन बोरशे गुरुजी यांनी केले.
सरकारी शाळांची सद्यस्थिती, वाढत्या खासगी शिक्षणाचा खर्च आणि सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, आज नर्सरीपासूनच पालकांना मोठ्या प्रमाणात शुल्काचा भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे गरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आव्हानात्मक बनत आहे.
यावर उपाय म्हणून आपल्या गावातील सरकारी व जिल्हा परिषद शाळा सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा चांगल्या झाल्यास पालकांचा मोठा आर्थिक भार कमी होईल आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावातच दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
७६ शाळांची प्रत्यक्ष पाहणी
मागील वर्षी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यव्यापी शाळा पाहणी दौरा करण्यात आला. त्याअंतर्गत बोरशे गुरुजी आणि त्यांच्या भोकरदन टीमने भोकरदन तालुक्यातील ७६ शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान काही शाळांमध्ये वर्गखोल्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, खेळाच्या मैदानाचा अभाव, शैक्षणिक गुणवत्तेबाबतच्या समस्या तसेच शिक्षकांवर असलेला बिगर-शैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार आढळून आल्याचा दावा करण्यात आला.
या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ‘झोपा काढो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनानंतर काही शाळांना निधी मिळाला तसेच काही ठिकाणी दुरुस्तीची कामे झाल्याचे बोरशे गुरुजी यांनी सांगितले. त्यामुळे लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनातून प्रशासनावर दबाव निर्माण करून बदल घडवून आणता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन
‘स्कूल ठीक करो अभियान’ देशव्यापी करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा, आपल्या गावातील शाळांची परिस्थिती जाणून घ्यावी आणि ग्रामसभेत शाळांच्या विकासासाठी ठराव मंजूर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांनीही या अभियानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम करता यावे आणि त्यांच्यावरील बिगर-शैक्षणिक कामांचा भार कमी व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवावा, असेही त्यांनी म्हटले.
सरकार, शिक्षण विभाग आणि संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे राजकीय संधी म्हणून न पाहता राष्ट्रीय जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन सुसज्ज इमारती, स्मार्ट क्लासरूम, प्रयोगशाळा, खेळाची मैदाने आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
“देशातील सरकारी शाळा सर्व आवश्यक सुविधांनी सक्षम झाल्या तर गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, पालकांवरील आर्थिक भार कमी होईल आणि देशाच्या विकासासाठी सक्षम पिढी तयार होईल,” असा विश्वास बोरशे गुरुजी यांनी व्यक्त केला.
“शाळा सुधारली तर पिढी सुधारेल आणि पिढी सुधारली तर राष्ट्र घडेल. त्यामुळे शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने ‘स्कूल ठीक करो’ जनआंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन करत त्यांनी “आगे बढो अभिजीत दीपके, हम तुम्हारे साथ हैं” असा संदेश दिला.
जयहिंद! जय भारत!
प्रतिनिधी महेंद्र बेराड







