चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरीचे आमिष; ८४ महिलांची सुमारे ३ कोटींची फसवणूक
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ८४ महिलांची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मनपा स्वच्छता विभागात कार्यरत असलेला कर्मचारी जितेंद्र सारसर आणि त्याची महिला साथीदार मंगला वानखेडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी जितेंद्र याने स्वतःला वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून महिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप आहे.
नोकरी मिळण्याच्या आशेने अनेक महिलांनी आरोपींकडे पैसे दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने महिलांना संशय आला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.
प्राथमिक तपासात ८४ महिलांकडून सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता असून २५० हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींनी आणखी किती जणांकडून पैसे घेतले, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि जमा केलेल्या पैशांचा वापर कुठे करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या इतर महिला पुढे आल्यास फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







