मगरीच्या हल्ल्यातून आईला वाचवले; १० वर्षांच्या चिमुरडीचे धाडस कौतुकास्पद


मगरीच्या हल्ल्यातून आईला वाचवले; १० वर्षांच्या चिमुरडीचे धाडस कौतुकास्पद

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे एका १० वर्षांच्या चिमुरडीने दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळे मगरीच्या हल्ल्यात सापडलेल्या तिच्या आईचा जीव वाचला. वाशिष्ठी नदीकाठी घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नंदिनी पवार या वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या असताना अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या जीवघेण्या प्रसंगामुळे नंदिनी यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.
त्यावेळी त्यांच्यासोबत असलेली त्यांची १० वर्षांची मुलगी स्वर्णी हिने कोणतीही भीती न बाळगता प्रसंगावधान राखले. स्वर्णीने आईचा हात घट्ट पकडून पूर्ण ताकदीने तिला नदीच्या दिशेने बाहेर खेचले. तिच्या धाडसी प्रयत्नांमुळे नंदिनी पवार मगरीच्या तावडीतून सुटल्या.
या हल्ल्यात नंदिनी पवार गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धाडस दाखवणाऱ्या स्वर्णीच्या प्रसंगावधानाचे आणि शौर्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
मगरींचा वावर असलेल्या नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि प्रशासनानेही अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!