वसतिगृहाच्या गुणवत्तेसाठी संयुक्त प्रयत्न; लेखी आश्वासनानंतर ‘आप’चे आमरण उपोषण मागे
भोकरदन, प्रतिनिधी/ महेंद्र बेराड:-दि. २५ ऑगस्ट २०२६ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन येथे ५ ऑगस्ट रोजी ४ ते ५ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेले आमरण उपोषण लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले.
या प्रकरणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना डॉ. अनिता राठोड यांनी पत्र क्र. २४७६, दि. २५ ऑगस्ट २०२६ अन्वये विविध कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. भोजन पुरवठादार मे. D.M.K. Enterprises यांच्या किराणा मालाची तपासणी करून नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत दोषींवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV आणि तक्रार पेटी कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले असून, बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थिनींनी लेखी तक्रार केल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे.
दरम्यान, संयुक्त बैठकीत वसतिगृहाच्या व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी दर आठवड्याला वसतिगृहात जाऊन भोजनाची चव घेऊन पाहणी करणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांचा पाठपुरावा आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि सहाय्यक समाज कल्याण आयुक्त संयुक्तपणे करणार असून, वसतिगृह तसेच निवासी शाळांमधील गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठीही संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद व लेखी आश्वासन मिळाल्याने पार्टी पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून २५ ऑगस्ट रोजीचे आमरण उपोषण मागे घेतले. मात्र, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही किंवा विद्यार्थिनींच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जालना जिल्हा सचिव बोरसे गुरुजी यांनी दिला.








