श्रावणात मटणाचा हट्ट; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू, आई-वडिलांना अटक


श्रावणात मटणाचा हट्ट; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू, आई-वडिलांना अटक

पुणे : वारजे-माळवाडी परिसरातील रामनगर येथे श्रावण महिन्यात मटण बनवून देण्याच्या हट्टावरून झालेल्या वादात वडिलांनी केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
महेश भागवत गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, महेश दारूच्या नशेत घरी आला होता. त्याने मटणाचे कालवण करून देण्याचा हट्ट धरला. मात्र, श्रावण महिना सुरू असल्याने आई-वडिलांनी मांसाहार करण्यास नकार दिला. त्यावरून वाद वाढला.
या वादातून वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या मारहाणीत महेशचा मृत्यू झाला.
घटनेनंतर महेशची आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) हिने पतीला मदत करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
महेशच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वारजे-माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!