पारध पोलिसांकडून तीन शाळांमध्ये 1660 विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच सुरक्षा व नशामुक्तीबाबत जनजागृती


पारध पोलिसांकडून तीन शाळांमध्ये 1660 विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच सुरक्षा व नशामुक्तीबाबत जनजागृती

पारध, दि. 27 ऑगस्ट/ प्रतिनिधी महेंद्र बेराड : भोकरदन तालुक्यातील पोलीस ठाणे पारधच्या वतीने पोलीस ठाणे हद्दीतील भास्करराव शिंगणे विद्यालय, अवघडराव सावंगी, रेणुका देवी विद्यालय, पिंपळगाव रेणुकाई आणि जनता विद्यालय, पारध या तीन शाळांमध्ये जवळपास 1660 विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती, विद्यार्थी सुरक्षा, गुड टच-बॅड टच, पोक्सो कायदा, सायबर फसवणूक, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम तसेच डायल 112 बाबत विशेष जनजागृती करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माने साहेब यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस हवालदार प्रकाश नामदेव शिनकर (बक्कल क्रमांक 498), पोलीस ठाणे पारध यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध सामाजिक, मानसिक व सुरक्षाविषयक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत छुप्या पद्धतीने वाढत असलेल्या विविध व्यसनांबाबत जनजागृती करण्यात आली. विशेषतः मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, मानसिक आरोग्यावर व व्यक्तिमत्त्व विकासावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून पुस्तक वाचन, नियमित अभ्यास आणि मैदानी खेळांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संपर्क करताना खबरदारी घेणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

गुड टच-बॅड टच आणि पोक्सो कायद्याबाबत विशेष माहिती देताना, कोणतीही व्यक्ती चुकीच्या पद्धतीने जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, अयोग्य स्पर्श करीत असेल किंवा विद्यार्थ्यांना त्रास देत असेल तर त्यांनी ही बाब निर्भयपणे आई-वडील, शिक्षक किंवा पोलिसांना सांगावी, असे आवाहन करण्यात आले.

तसेच शाळेत जाताना-येताना किंवा एकटेपणी कोणी पाठलाग करीत असेल अथवा जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. आवश्यकतेनुसार डायल 112, पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक किंवा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये वेळीच माहिती मिळाल्यास अप्रिय घटना घडण्यापूर्वीच आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणे शक्य होते, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी माननीय पोलीस अधीक्षक, जालना व माननीय अपर पोलीस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सुरक्षा मंत्र : आधुनिक जगात एक पाऊल पुढे’ या पुस्तकातील विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना ‘सुरक्षा मंत्र’ या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे चरित्र वाचावे, चांगले व सकारात्मक विचार आत्मसात करावेत, आई-वडिलांशी नेहमी सत्य बोलावे, बंधुभाव व प्रेमाची वृत्ती जोपासावी आणि चांगल्या संस्कारांवर आधारित जीवन जगावे, असे आवाहन करण्यात आले.

या तीन शाळांमधील एकूण 1,660 विद्यार्थ्यांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत व कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

पारध पोलिसांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्ती, वैयक्तिक सुरक्षा, सायबर सुरक्षा, पोक्सो कायदा आणि सामाजिक जागरूकतेबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती झाल्याचे दिसून आले.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!