श्रीराम फायनान्सच्या वसुली एजंट्सच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; बाणेर शाखेतील धक्कादायक घटना
पुणे:श्रीराम फायनान्सच्या वसुली एजंट्सच्या जाचाला आणि मानसिक छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रबुद्ध मगरे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रबुद्ध मगरे यांनी २०२३ मध्ये श्रीराम फायनान्सच्या वाकड शाखेकडून वाहन कर्ज (Vehicle Loan) घेतले होते. दरम्यानच्या काळात झालेल्या एका अपघातामुळे त्यांचे उत्पन्न बंद झाले आणि त्यांना कर्जाचे नियमित हप्ते भरणे कठीण झाले होते.
या परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी श्रीराम फायनान्सच्या बाणेर शाखेतील वसुली एजंट्सनी त्यांच्याकडे २ लाख रुपये त्वरित भरण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न भरल्यास गाडी ओढून नेण्याची आणि गंभीर परिणामांची धमकी देऊन त्यांना सतत मानसिक त्रास दिला जात होता. या वाढत्या छळाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर प्रबुद्ध यांनी आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेमुळे खासगी फायनान्स कंपन्यांच्या गुंडगिरी आणि बेकायदेशीर वसुली पद्धतींवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
— प्रतिनिधी: उमेश कुलकर्णीq




