खारघरमध्ये ३,४०० SIR फॉर्मची अनधिकृत झेरॉक्स; भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा, पाच BLO निलंबित


खारघरमध्ये ३,४०० SIR फॉर्मची अनधिकृत झेरॉक्स; भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा, पाच BLO निलंबित

नवी मुंबई :खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये मतदारांकडून भरून घेण्यात आलेले तब्बल ३,४०० SIR गणनापत्रक आढळून आल्याने नवी मुंबईत राजकीय खळबळ उडाली आहे. हे फॉर्म झेरॉक्स करण्यासाठी आणणारा व्यक्ती भाजप युवा मोर्चाशी संबंधित पदाधिकारी असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी झेरॉक्स सेंटरवर धाव घेतल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर SIR फॉर्म जप्त केले.
महसूल विभागाच्या तपासणीत या फॉर्मवर मतदारांचे भरलेले तपशील, मूळ छायाचित्रे आणि BLO यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समोर आले. प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित पाच BLOंना निलंबित केले. तसेच भाजप युवा मोर्चाशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या सूरज पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात केवळ BLOंवर कारवाई करून चालणार नाही, तर फॉर्म संबंधित व्यक्तीपर्यंत कसे पोहोचले आणि त्यामागे आदेश कोणी दिले, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
या प्रकारामुळे मतदारांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
— प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!