आयसर’मध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही कायम; ४८ तासांनंतरही तोडगा नाही
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (IISER – आयसर) विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शैक्षणिक सुधारणा, मानसिक आरोग्य सुविधांचा अभाव तसेच प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या जाचक नियमांविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
गुरुवारी सायंकाळपासून संस्थेचे संचालक आणि अधिष्ठाता (Dean) यांच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थी ठिय्या देऊन बसले आहेत. आंदोलनाला ४८ तास उलटूनही विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर आपल्या विविध मागण्या मांडल्या असून, ‘आयसर’चे संचालक स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संस्थेच्या प्रशासनासमोर त्यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे






