चिपळूणजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ शिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, शिरणी फाट्याजवळील धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास सुरू आहे.
Views: 33





