अंध भेळगाडी चालकावरच अतिक्रमण कारवाई का?; सचिन काळभोर यांचा महापालिका प्रशासनाला सवाल


अंध भेळगाडी चालकावरच अतिक्रमण कारवाई का?; सचिन काळभोर यांचा महापालिका प्रशासनाला सवाल

पिंपरी-चिंचवड : परवाना असलेल्या पथारी व हातगाडीधारकांवर अतिक्रमण कारवाई करताना महापालिका प्रशासनाने समान निकष लागू करावेत. केवळ राजकीय दबावामुळे निवडक व्यक्तींवर कारवाई करून अंध व दिव्यांग व्यावसायिकांना वेठीस धरू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

निगडी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील बसथांब्याजवळ भेळगाडी व्यवसाय करणारी व्यक्ती अंध असून, संबंधित व्यक्तीकडे व्यवसायाचा परवाना असतानाही तिच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे. एका अंध व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरासह फ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व इतर अतिक्रमणे असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे. या ठिकाणीही समान पद्धतीने अतिक्रमण कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महापालिकेचे अधिकारी घोटकुले आणि भगत हे काही पथारीधारकांवर कारवाई करत असून, इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही काळभोर यांनी केला आहे. काही ठिकाणी आर्थिक व्यवहारांमुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, त्याची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

निगडी बसथांबा परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचे सांगत, त्या परिसरातील सर्व अनधिकृत व्यवसायांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. मात्र, परवाना असलेल्या तसेच अंध व दिव्यांग व्यक्तींच्या उपजीविकेचा विचार न करता केवळ त्यांच्यावरच कारवाई करणे अन्यायकारक आहे, असे काळभोर यांनी म्हटले आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाई पारदर्शक व समान निकषांवर व्हावी आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!