धार्मिक स्थळांच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या; तातडीने स्वच्छता करण्याची मागणी


धार्मिक स्थळांच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या; तातडीने स्वच्छता करण्याची मागणी

लेहा,ता. भोकरदन प्रतिनिधी/ महेंद्र बेराड: गावातील विविध धार्मिक स्थळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा, गवत व अस्वच्छता पसरल्याने नागरिक व भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करीत मृत्युंजय मित्र मंडळ, लेहा यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांच्या परिसराची तातडीने स्वच्छता करून नाल्यांमध्ये साचलेली घाण हटविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लेहा गावातील अंबाभवानी चौक, मारुती मंदिर, महादेव मंदिर, गरिब नवाज बाबा दर्गा तसेच आसरा माता स्थळ आदी धार्मिक ठिकाणांच्या परिसरात घाण, कचरा व वाढलेले गवत असल्याने परिसराची अवस्था अत्यंत अस्वच्छ झाली आहे. या परिस्थितीमुळे गावातील नागरिक व भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून धार्मिक स्थळांची पवित्रता व स्वच्छता राखण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

विशेषतः दर सोमवारी महादेव मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येते. मात्र, मंदिर परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधीमुळे पूजा-अर्चा व आरती करताना भाविकांना मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे भाविकांचे पूजेमध्ये व आरतीमध्ये मन लागत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी यापूर्वीही वारंवार तोंडी स्वरूपात संबंधितांकडे स्वच्छतेबाबत सूचना व मागणी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप या समस्येकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन धार्मिक स्थळांच्या परिसरातील घाण, कचरा व वाढलेले गवत साफ करावे, तसेच नाल्यांची नियमित स्वच्छता करून गावातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय गावातील बंद पडलेली पाणी फिल्टर व्यवस्था सुरळीत करून ती नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे आवश्यक असल्याने या प्रश्नाकडेही ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर प्रश्नांकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही न झाल्यास ही बाब तालुका स्तरावरील संबंधित प्रशासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मांडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन मृत्युंजय मित्र मंडळ, लेहा यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्यात आले असून, पंचायत समिती कार्यालय, भोकरदन, जि. जालना यांनाही माहितीस्तव निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

धार्मिक स्थळांची स्वच्छता, गावातील नाल्यांची नियमित सफाई आणि पाणी फिल्टर व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. ग्रामपंचायत प्रशासन या निवेदनाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्षात स्वच्छता मोहीम कधी राबविली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!