पुणे रेल्वे स्थानकावर महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला; लोहमार्ग पोलिसांकडून अहमदाबादच्या आरोपीला गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी
पुणे:पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत चढणाऱ्या एका महिलेला ओढून काढून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर वार करून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांत शिताफीने आरोपी मोहम्मद रफिक काटीयार शेख (वय ३०, रा. अहमदाबाद, गुजरात, सध्या रा. पुणे फिरस्ता) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांच्या अंमलदारांनी जखमी महिलेला वेळेत वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तबातमीदारांच्या मदतीने तपास वेगाने सुरू केला. आरोपी मोहम्मद रफिक काटीयार शेख हा गुन्हा केल्यानंतर थेट गुजरात येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी गनिमी काव्याने आणि कौशल्याने सापळा रचून त्याला पळून जाण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या व न्यायालयात हजर केले.
रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता, पोलिसांनी प्रसंगावधान राखून केलेल्या या कामगिरीचे प्रवाशांकडून व सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचे मा. पोलीस अधिक्षकांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले. “पुणे रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही,” असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक श्री. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुणे विभाग) श्री. रविंद्र गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक फंड, पोलीस उपनिरीक्षक रणवरे, पोलीस उपनिरीक्षक महाजन, सहाय्यक पोलीस फौजदार कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार अमरदीप साळुंके, पोलीस हवालदार आवटी, भोसले, पोलीस हवालदार १०३० पाटील, महिला पोलीस हवालदार १३८८ लोखंडे, पोलीस अंमलदार कांबळे, पोलीस अंमलदार २७१ नेवारे आणि पोलीस अंमलदार १११ गवळी,पोलीस कॉन्स्टेबल 24 कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक फंड करत आहेत.









