टाकळीभानचा ‘रुद्रा’ आता पुण्यातील शेवाळे अण्णांच्या दावणीला; ३१ लाखांची विक्री.


टाकळीभानचा ‘रुद्रा’ आता पुण्यातील शेवाळे अण्णांच्या दावणीला; ३१ लाखांची विक्री

 

टाकळीभान प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा नादच खुळा ,बैलगाडा क्षेत्रात आपल्या गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या वैभव मैड आणि श्रीराम मैड यांच्या ‘रुद्रा’ बैलाने आपल्या दमदार कामगिरीने आणि गुणवैशिष्ट्यांनी बैलगाडा शौकिनांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रुद्राच्या तोडीचा योग्य ‘पेरा’ स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने त्याच्या गुणांना आणखी मोठे व्यासपीठ मिळावे, या उदात्त हेतूने आणि मनाचा मोठेपणा दाखवत रुद्राला पुण्यातील नामांकित बैलगाडा मालक शेवाळे अण्णा यांच्या दावणीला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुद्राची तब्बल ३१ लाख रुपये किमतीला खरेदी करण्यात आली असून, या व्यवहारामुळे टाकळीभानच्या बैलगाडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रुद्र हा केवळ एक बैल नसून, त्याच्या माध्यमातून टाकळीभानचे नाव बैलगाडा क्षेत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे काम वैभव मैड आणि श्रीराम मैड यांनी केले आहे.

रुद्राची ताकद, वेग, बांधा आणि त्याने दाखवलेली कामगिरी यामुळे त्याच्याबद्दल बैलगाडा शौकिनांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले होते.

मात्र, रुद्राच्या तोडीचा पेरा मिळत नसल्याने त्याच्या गुणांना मर्यादा येऊ नयेत, त्याला अधिक चांगले व्यासपीठ मिळावे आणि त्याच्या क्षमतेला पूर्ण वाव मिळावा, या विचारातून रुद्राला पुण्याच्या दिशेने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या आवडत्या बैलापासून दूर होण्याचा निर्णय घेणे सोपे नसतानाही, त्याच्या भविष्यातील कामगिरीचा विचार करून वैभव मैड आणि श्रीराम मैड यांनी हा निर्णय घेतला.

पुण्यातील नामांकित बैलगाडा मालक शेवाळे अण्णा यांच्या दावणीला रुद्राचा प्रवेश होत असल्याने त्याच्या पुढील कामगिरीकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांचे लक्ष लागले आहे.

रुद्राला निरोप देतानाही टाकळीभानमध्ये भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. डीजेच्या तालावर वाजतगाजत रुद्राला निरोप देण्यात आला. आपल्या गावचे नाव मोठे करणाऱ्या या रुद्रासाठी ग्रामस्थ आणि बैलगाडा शौकिनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टाकळीभानचा रुद्रा आता पुण्याच्या दावणीत असला, तरी त्याच्या माध्यमातून टाकळीभानचे नाव महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रात आणखी उंच जाईल, अशीच अपेक्षा बैलगाडा शौकिन व्यक्त करत आहेत.

प्रतिनिधी:  दिलीप लोखंडे श्रीरामपूर


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!