पुणे पोलीस भरतीतील बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा; १९ जणांनी मिळवली नोकरी
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रियेत खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ उमेदवारांनी पोलीस दलात नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या उमेदवारांनी ‘कुराश’ आणि ‘ड्रॅगनबोट’ या क्रीडा प्रकारांची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तसेच या प्रकरणातील अन्य संबंधितांची चौकशी सुरू असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






