दहीहंडीचा लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; जुन्या सांगवीतील घटना


दहीहंडीचा लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; जुन्या सांगवीतील घटना

पिंपरी-चिंचवड : दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पिंपरी-चिंचवडमधील जुन्या सांगवी परिसरात घडली.
सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास स्टेज आणि स्वागत कमान उतरवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी लोखंडी सांगाड्याचा एक अवजड भाग सलमा पठाण यांच्या अंगावर पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने उपचारासाठी औंध रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, सलमा पठाण यांचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, स्टेजला परवानगी होती का आणि सुरक्षेच्या उपाययोजना पाळण्यात आल्या होत्या का, याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!