सीट बेल्ट, सिग्नल व नो-पार्किंगच्या नावाने बनावट ई-चलान? चौकशीची मागणी
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : विजय अडसूळ) : पिंपरी-चिंचवड शहरात सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे तसेच नो-पार्किंगच्या नियमभंगाच्या नावाखाली नागरिकांना बनावट ई-चलान पाठवून फसवणूक केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून सत्यता समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काळभोर यांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिकांना पोलिस किंवा वाहतूक विभागाच्या नावाने ऑनलाइन पावत्या व संदेश पाठविले जात असून, त्यामध्ये वाहतूक नियमभंग केल्याचे नमूद केले जाते. या संदेशांद्वारे नागरिकांना ऑनलाइन दंड भरण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
या प्रकाराची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना देण्यात आल्याचे सचिन काळभोर यांनी सांगितले. संबंधित संदेश, पावत्या आणि ऑनलाइन व्यवहारांची पडताळणी करून हा प्रकार बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यामागील व्यक्ती किंवा रॅकेटचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे यांसारख्या वाहतूक नियमभंगासाठी ई-चलान जारी केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी प्राप्त झालेल्या ई-चलानची तारीख, वेळ, ठिकाण आणि नियमभंगाची माहिती अधिकृत प्रणालीवर तपासल्यानंतरच दंड भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या नावाने संशयास्पद लिंक, संदेश किंवा ऑनलाइन पेमेंटची मागणी आल्यास नागरिकांनी सावध राहावे. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ








