महावितरणचा निष्काळजीपणा? बिजलीनगर येथील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग; १२ तास वीज खंडित झाल्याने नागरिक हैराण ​:


महावितरणचा निष्काळजीपणा? बिजलीनगर येथील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग; १२ तास वीज खंडित झाल्याने नागरिक हैराण

पिंपरी-चिंचवड:

महावितरणच्या बिजलीनगर येथील एका महत्त्वाच्या ट्रान्सफॉर्मरला आज रविवारी (६ सप्टेंबर) सकाळी १० वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शहराच्या विविध भागांतील विद्युत पुरवठा सलग १२ तासांहून अधिक काळ खंडित झाला. यामुळे संपूर्ण चिंचवडगाव, पिंपरीचा काही भाग, गावडे नगर, रावेत, काळेवाडीचा बहुतांश भाग, चिंचवडे नगर आणि वाल्हेकर वाडी यांसारख्या प्रमुख परिसरांतील नागरिकांना मोठा फटका बसला.

​या घटनेची माहिती मिळताच महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. घडलेल्या अपघाताबाबत त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत अनेक गंभीर प्रश्न व शंका उपस्थित केल्या आहेत.

​वीज पुरवठा इतका वेळ बंद राहिल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. विशेषतः घरगुती आणि विविध रुग्णालयांमध्ये उपचाराधीन असलेल्या रुग्णांचे यामुळे हाल झाले. या सर्व प्रकाराला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल बच्चे यांनी केला आहे. “महावितरण या घटनेचे खापर महापारेषणवर फोडत आहे, तर महापारेषण स्वतःची चूक मान्य करण्यास तयार नाही. प्रशासनाच्या या टोलवाटोलवीमुळे जनता भरडली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

​या गंभीर अपघाताची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मधुकर बच्चे यांनी केली आहे. “सदर घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी न झाल्यास अथवा हा विषय केवळ ‘नैसर्गिक अपघात’ म्हणून दाबण्याचा प्रयत्न केल्यास, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडू,” असा इशाराही बच्चे यांनी दिला आहे.

प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!