राणा दांपत्याकडून दहीहंडी रद्द; ५१ लाखांची मदत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राणा दांपत्याचा मोठा निर्णय; दहीहंडी रद्द करून ५१ लाखांची मदत
अमरावती (प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी) : अमरावती जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी यंदाची भव्य दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी सोहळ्यासाठी नियोजित करण्यात आलेला तब्बल ५१ लाख रुपयांचा निधी यंदा उत्सवावर खर्च न करता गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय राणा दांपत्याने घेतला आहे. या निधीतून अमरावती जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नवजात बालकांच्या कुटुंबीयांसह इतर गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली.
दुःखद प्रसंगी उत्सवापेक्षा पीडित कुटुंबांना आधार देण्याला प्राधान्य देत राणा दांपत्याने घेतलेल्या या निर्णयाची चर्चा अमरावतीत होत आहे. दहीहंडीचा जल्लोष टाळून त्यासाठीचा निधी गरजूंच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





