जात-धर्माच्या वादात अडकवून ठेवायचंय; ठाण्यात राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका


जात-धर्माच्या वादात अडकवून ठेवायचंय; ठाण्यात राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

ठाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ सप्टेंबर रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. बेरोजगारी, महागडे शिक्षण, आर्थिक परिस्थिती, शेतकरी प्रश्न तसेच जात-धर्माच्या राजकारणावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

देशाचा GDP ७.८ टक्के वाढल्याचे सांगितले जात असताना नागरिकांना परदेशात जाऊ नका आणि गरज नसेल तर सोने खरेदी करू नका, असे आवाहन का केले जात आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. GDP चांगला असेल तर मग नागरिकांनी परदेशात का जाऊ नये आणि सोने का खरेदी करू नये, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याचवेळी २०२१ ते २०२६ या कालावधीत ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातील आपले कामकाज बंद केल्याचा दावा त्यांनी केला. या कंपन्यांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारावर त्याचा काय परिणाम झाला, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील बेरोजगारी, महागडे शिक्षण, आर्थिक अडचणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जात आणि धर्माच्या वादात लोकांना अडकवून ठेवले जात असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरीने इतर कोणालाही बसवता येणार नाही, असे मत त्यांनी राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांच्या वादाच्या संदर्भात व्यक्त केले.

पुण्यातील डीजे-डॉल्बी आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. सण-उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण आणि लेझरच्या अतिवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्पष्ट नियमावली असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागपूरमध्ये डीजेबाबत नियम लागू होत असतील, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीही समान धोरण असावे, असा सवाल त्यांनी केला.

आगामी गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचे तसेच दंगली घडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी कोणत्याही चिथावणीला बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!