सोलापूर-मुंबई विमानसेवा अवघ्या महिनाभरात स्थगित; प्रवासी प्रतिसादाचा फटका


सोलापूर-मुंबई विमानसेवा अवघ्या महिनाभरात स्थगित; प्रवासी प्रतिसादाचा फटका

सोलापूर (प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी) : सोलापूरकरांसाठी महत्त्वाची असलेली सोलापूर-मुंबई विमानसेवा अवघ्या एका महिन्यातच स्थगित करण्यात आली आहे. स्टार एअरने २ ऑगस्टपासून सुरू केलेली ही सेवा कमी प्रवासी प्रतिसादामुळे थांबविल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध नसणे, अपेक्षेप्रमाणे प्रवासी प्रतिसाद न मिळणे तसेच वाढलेले इंधन दर ही सेवा स्थगित करण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांना पुन्हा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

स्टार एअरने सुमारे एक महिन्यासाठी विमानसेवा स्थगित करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिल्याचे समजते. मात्र, ही सेवा पुन्हा नेमकी कोणत्या तारखेपासून सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

सोलापूर-मुंबई थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, महिनाभरातच सेवा स्थगित झाल्याने विमानसेवेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!