५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले फक्त ५,१००; गोविंदांचा दहीहंडीखाली ठिय्या


५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले फक्त ५,१००; गोविंदांचा दहीहंडीखाली ठिय्या

जळगाव : दहीहंडी उत्सवात ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून प्रत्यक्षात केवळ ५,१०० रुपये देण्यात आल्याचा आरोप करत गोपाळ पेठ मंडळाच्या गोविंदांनी आंदोलन केले. जळगावातील सुभाष चौक मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात हा प्रकार घडला.

गोपाळ पेठ मंडळाच्या गोविंदांनी तब्बल महिनाभर सराव करून दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग घेतला. गोविंदांनी तब्बल सात थरांची मानवी मनोरा रचून दहीहंडीला सलामी दिली. मात्र, आयोजकांकडून जाहीर करण्यात आलेल्या ५१ हजार रुपयांच्या बक्षिसाऐवजी केवळ ५,१०० रुपये देण्यात आल्याने गोविंदांमध्ये संताप निर्माण झाला.

जाहीर केलेल्या बक्षिसाची पूर्ण रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत गोपाळ पेठ मंडळाच्या गोविंदांनी दहीहंडीखालीच ठिय्या मांडला. त्यानंतर भररस्त्यात ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

महिनाभर मेहनत आणि सराव करून दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्यानंतर जाहीर केलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा अत्यल्प रक्कम देण्यात आल्याने आयोजकांवर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. जाहीर केलेली ५१ हजार रुपयांची पूर्ण रक्कम मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा गोपाळ पेठ मंडळाच्या गोविंदांनी दिला आहे.

या प्रकारामुळे दहीहंडी उत्सवातील बक्षिसाच्या घोषणेवरून आयोजक आणि गोविंदा मंडळामध्ये वाद निर्माण झाला असून, आता जाहीर केलेले बक्षीस प्रत्यक्षात मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!