श्री पराशर महाराज संस्थान ते पाताळेश्वर मंदिरापर्यंत भव्य कावड यात्रा; शेकडो महिला-पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग


‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला पारध–अवघडराव सावंगी मार्ग

श्री पराशर महाराज संस्थान ते पाताळेश्वर मंदिरापर्यंत भव्य कावड यात्रा; शेकडो महिला-पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

पारध | प्रतिनिधी:- महेंद्र बेराड

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ‘ओम नमः शिवाय,‘हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे’, ‘जय श्री पाताळेश्वर’ आणि ‘पराशर महाराज की जय’ च्या जयघोषाने पारध–अवघडराव सावंगी मार्ग भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भोकरदन तालुक्यातील पारध येथील महर्षी पराशर महाराज मंदिरापासून अवघडराव सावंगी येथील श्री पाताळेश्वर मंदिरापर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या कावड यात्रेत परिसरातील शेकडो महिला व पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी महर्षी पराशर महाराज मंदिरातून कावड यात्रेला सुरुवात झाली. भाविकांनी डोक्यावर कावड घेत भक्तिभावाने पायी प्रवास करत पाताळेश्वर मंदिर गाठले.

सुमारे पाच किलोमीटरचा हा पायी प्रवास ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पार पडला. मार्गभर भाविकांकडून भगवान शंकराचे नामस्मरण, भजन आणि जयघोष करण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

महिलांचा लक्षणीय सहभाग

या कावड यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे महिला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत डोक्यावर कावड घेतली. त्याचबरोबर लहान मुलांसह पुरुष भाविकांनीही मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभाग घेतला.

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी निघालेल्या या कावड यात्रेमुळे पारध परिसरात दिवसभर धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पाताळेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर भाविकांनी भगवान महादेवाचे दर्शन घेत अभिषेक व पूजाअर्चा केली. त्यानंतर श्री देवेंद्र चैतन्य स्वामी यांनी सर्व भाविक भक्तांना अध्यात्मिक प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करून प्रसादाचे वाटप केले. यानंतर श्री समाधान लोखंडे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळेस सावंगी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पठाडे, सावळे, तेलंग्रे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

आयोजकांचा पुढाकार

कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी समाधान महाराज,आनंदा जाधव, संजय लोखंडे,ज्ञानेश्वर लोखंडे, महेंद्र बेराड,सुरेश काळे, प्रल्हाद मोकाशे, सुरेश महाराज देशमुख, विनोद लोखंडे, नरेंद्र कानडे, गजानन पाखरे, आदित्य लोखंडे, सागर देशमुख, पवन जाधव, नवनाथ जंजाळ, कृष्णा लोखंडे, प्रेम लोखंडे यांच्यासह परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.

श्रावणातील धार्मिक परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेमुळे पारध व अवघडराव सावंगी परिसरातील धार्मिक एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!