टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सोसायटीतील राहुल पटारे यांच्या सभासदत्वावरील तक्रार निकाली

टाकळीभान प्रतिनिधी-अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नावाजलेली टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मधील राहुल आप्पासाहेब पटारे यांच्या सभासदत्वाबाबत करण्यात आलेली तक्रार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर यांनी निकाली काढली आहे. संस्थेच्या उपविधी क्रमांक ६(३) नुसार सभासदासाठी किमान १० आर कृषी शेतजमीन असणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करून संजय संपत रणनवरे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.
तक्रारीत राहुल पटारे यांच्या सभासदत्वाची उपविधीतील अनिवार्य पात्रतेच्या अनुषंगाने चौकशी करून, पात्रता पूर्ण होत नसल्यास सभासदत्व रद्द करावे तसेच संचालकपदासाठी कायदेशीरदृष्ट्या अपात्र ठरवून कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराने सादर केलेल्या मुद्द्यांमध्ये महसुली अभिलेखांचा हवाला देण्यात आला होता. नमुना ८-अ मध्ये गट क्रमांक ३४७/ब हे क्षेत्र ‘अकृषिक’ असल्याची नोंद असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच उपलब्ध ७/१२ उताऱ्यानुसार गट क्रमांक २५१ मध्ये केवळ २.७५ आर कृषी जमीन शिल्लक असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे उपविधी क्रमांक ६(३) मध्ये अपेक्षित असलेली किमान १० आर कृषी शेतजमीन उपलब्ध आहे किंवा नाही, याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराने यापूर्वी संस्थेकडेही लेखी हरकत दिल्याचे नमूद केले होते. संबंधित जमिनीची विक्री अथवा हस्तांतरण झाले आहे का, तसेच सभासदत्व घेताना कोणत्या जमिनीच्या आधारे पात्रता पूर्ण केली होती, याची महसुली अभिलेख, फेरफार नोंदी, विक्रीखत व इतर कागदपत्रांच्या आधारे तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
संस्थेने काय मांडले? या प्रकरणात सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुनावणीची प्रक्रिया करण्यात आली. संस्थेचे सचिव तसेच श्री. राहुल पटारे यांना लेखी म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली. संस्थेच्या सचिवांनी सादर केलेल्या म्हणण्यानुसार, राहुल पटारे हे संस्थेचे जुने सभासद असून त्यांच्या नावावर शेअर्सपोटी २० हजार रुपये जमा आहेत.
तसेच त्यांच्या नावावर टाकळीभान ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ४३५ मध्ये २० आर क्षेत्र असल्याचे संस्थेला कळविण्यात आले होते. त्यासंदर्भातील खरेदीखताची प्रतही संस्थेकडे सादर करण्यात आल्याचे लेखी म्हणण्यात नमूद करण्यात आले. संबंधित जमिनीवर ऊस पिकासाठी संस्थेकडून ३५ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचेही संस्थेने स्पष्ट केले.
राहुल पटारे यांचे म्हणणे
राहुल आप्पासाहेब पटारे यांनी आपल्या लेखी म्हणण्यात उपविधी क्रमांक ६(३) नुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रात किमान १० आर क्षेत्र असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आपल्या नावावर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गट क्रमांक ४३५ मध्ये २० आर क्षेत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभासद होताना त्यांच्या नावावर असलेलीच जमीन आजही त्यांच्या नावावर असणे, अशी कोणतीही अट उपविधीत नसल्याचेही त्यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणे योग्य ठरणार नाही, असा दावा त्यांनी केला.
सहाय्यक निबंधकांचा निर्णय
तक्रारदाराचे मुद्दे, संस्थेच्या सचिवांचे लेखी म्हणणे आणि श्री. राहुल पटारे यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे यांचे अवलोकन केल्यानंतर सहाय्यक निबंधकांनी संबंधित बाबींचा विचार केला.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, राहुल पटारे हे जुने सभासद असून त्यांच्या नावावर संस्थेचे २० हजार रुपयांचे शेअर्स जमा आहेत. तसेच टाकळीभान ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ४३५ मध्ये त्यांच्या नावावर २० आर क्षेत्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या क्षेत्रावर ऊस पिकासाठी संस्थेकडून ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचेही नोंदविण्यात आले आहे.
या बाबींच्या आधारे राहुल पटारे यांनी संस्थेच्या उपविधी क्रमांक ६(३) मधील अट पूर्ण केली असल्याचे दिसून येत असल्याचे सहाय्यक निबंधकांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल पटारे यांचे सभासदत्व रद्द करून त्यांना संचालकपदासाठी अपात्र ठरविण्याबाबत करण्यात आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





