आन्वा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीवर आक्षेप; महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व न दिल्याचा आरोप


आन्वा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीवर आक्षेप; महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व न दिल्याचा आरोप

निवड रद्द करून नियमानुसार फेरनिवड करण्याची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

पारध/आन्वा, ता. भोकरदन, जि. जालना प्रतिनिधी : महेंद्र बेराड

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याची तरतूद असताना, झालेल्या निवडीत महिलांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत दीपक सर्जेराव सोनुने यांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भोकरदन यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देऊन सदर निवड प्रक्रिया रद्द करून नियमानुसार फेरनिवड घेण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, आन्वा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण १७ सदस्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये केवळ ३ महिला सदस्यांची निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्याची तरतूद असताना हे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने निवड प्रक्रिया नियमांनुसार झाली नसल्याचा आक्षेप तक्रारदाराने घेतला आहे.

निवड रद्द करून फेरनिवडीची मागणी

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून—

1. झालेली शाळा व्यवस्थापन समितीची निवड रद्द करावी.

2. महिलांना नियमानुसार ५० टक्के प्रतिनिधित्व देण्यात यावे.

3. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीची फेरनिवड घेण्यात यावी.

4. फेरनिवड प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी.

5. सदर कार्यवाहीबाबत लेखी स्वरूपात माहिती देण्यात यावी.

 

अशा मागण्या तक्रार अर्जातून करण्यात आल्या आहेत.

शिक्षण विभागाच्या चौकशीकडे लक्ष

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित झाल्याने आता शिक्षण विभाग या प्रकरणाची काय भूमिका घेतो, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. शाळा व्यवस्थापन समितीची निवड शासनाच्या लागू नियमांनुसार झाली आहे की नाही, महिलांना नियमानुसार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे की नाही, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका तक्रारदाराने मांडली आहे.

दरम्यान, या प्रकरणात शिक्षण विभागाकडून चौकशी करून प्रत्यक्ष निवड प्रक्रिया व संबंधित नियमांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!