MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पेपरफुटीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत सखोल चौकशी


MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पेपरफुटीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत सखोल चौकशी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या MPSC विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांवर सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी सखोल तपास सुरू असून, हा तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेला जाईल. प्रणाली सुधारण्यात सरकारला रस आहे, प्रकरण लपवण्यात नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा करण्यासाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभर जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न आणि सूचना समितीसमोर मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

गट-ब आणि गट-क मुख्य व पूर्व परीक्षा २०२५ ची चौकशी करण्यात येणार असून, इतर परीक्षांबाबत तक्रारी असल्यास त्यांचीही फेरतपासणी केली जाणार आहे. संबंधित तपास पूर्ण होईपर्यंत काही परीक्षांच्या मुलाखती स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

चर्चेतील प्रमुख निर्णय

▪️ औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी सखोल तपास सुरू राहणार.

▪️ व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वंकष सुधारणा समिती स्थापन होणार.

▪️ गट-ब व गट-क मुख्य व पूर्व परीक्षा २०२५ ची चौकशी होणार.

▪️ विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार.

▪️ एसआयटीमार्फत संबंधित तक्रारींची चौकशी केली जाणार.

▪️ माहिती अधिकारांतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत MPSC ला शिफारस केली जाणार.

▪️ तक्रारी असलेल्या इतर परीक्षांचीही फेरतपासणी केली जाणार.

▪️ गुन्हे शाखेचा प्राथमिक तपास अहवाल सार्वजनिक करण्याबाबत कार्यवाही केली जाणार.

▪️ लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार.

▪️ राजूरकर समितीच्या शिफारसींची पडताळणी करून योग्य शिफारसींची अंमलबजावणी केली जाणार.

▪️ पोलीस भरतीत दोन्ही पायांना चिप किंवा अन्य पर्यायांचा विचार केला जाणार.

▪️ प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी गुणांकनाचा एकसमान पॅटर्न करण्याचा प्रयत्न केला जाणार.

▪️ सारथी, बार्टी आणि महाज्योतीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले जाणार.

▪️ मुलाखतींसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार.

▪️ PMC आणि MMRDA परीक्षांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार.

▪️ MPSC अध्यक्ष किंवा सचिवांविरोधात ठोस पुरावे दिल्यास स्वतंत्र चौकशी केली जाणार; दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

▪️ संपूर्ण प्रक्रियेला कालबद्ध स्वरूप देत पुढील आठ दिवसांत कार्यवाही सुरू केली जाणार.

▪️ आगामी परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केल्यानंतरच परीक्षा घेण्यावर भर दिला जाणार.

▪️ MPSC मध्ये स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता हा मुख्य निकष असेल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!