मुंबई लोकलमधील गर्दीचा कळस; महिलांनाही लटकून प्रवास करण्याची वेळ
मुंबई लोकलमधील गर्दीचा कळस;
महिलांनाही लटकून प्रवास करण्याची वेळ
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दी आता प्रवाशांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनली आहे. गर्दीच्या वेळेत अनेक प्रवाशांना अक्षरशः दरवाजाला लटकून किंवा एकमेकांना चिटकून प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे, या गर्दीपासून महिलाही सुटलेल्या नाहीत.
एक महिला सकाळी घरातून बाहेर पडते, दिवसभर आठ तास काम करते, त्यानंतर पुन्हा प्रचंड गर्दीत चिटकून प्रवास करून घरी पोहोचते आणि घरातील जबाबदाऱ्या पार पाडते. कामाच्या ठिकाणी आठ तास आणि प्रवासात तासन्तास होणारी ही घुसमट महिलांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासात भर घालणारी आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, लोकलमधून प्रवासी पडल्याची किंवा अपघात झाल्याची घटना घडली की दोन-चार दिवस त्यावर चर्चा होते. प्रशासनाकडून पाहणी, आश्वासने आणि उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात; मात्र काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच होते.
प्रश्न असा आहे की, एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? अपघात होण्याची वाट पाहण्याऐवजी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आधीच ठोस उपाययोजना का केल्या जाऊ नयेत?
गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवणे, रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणे, पाचवा-सहावा मार्ग आणि इतर पायाभूत प्रकल्पांना गती देणे, सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण करणे तसेच मेट्रो आणि बस सेवांचे जाळे अधिक सक्षम करणे आवश्यक आहे.
आता सरकार आणि रेल्वे प्रशासनाला थेट प्रश्न—दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असताना, एखादा अपघात होईपर्यंत प्रशासनाची जबाबदारी संपते का? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि त्यासाठी उत्तरदायी कोण?
अपघातानंतर दोन दिवस संवेदना व्यक्त करण्यापेक्षा, अपघात होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय कधी होणार?
मुंबईकरांना या प्रश्नाचे आश्वासन नव्हे, तर कृतीतून उत्तर हवे आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






